ज्याचे जळते.. त्यालाच कळते याची प्रचीती आज शहादा स्टेट बॅकसमोर नारळ विक्री करत असलेल्या असहाय्य श्रीमती पुनम विनोद दुसाणे या महिलेच्या दयनीय अवस्थेवरुन आली.. त्याचे झाले असे कि आज मी व माझे सहशिक्षक श्री. दिलवरसिंग मान्या पावरा ... आम्ही दोघेही नारळ- पाणी पिण्यासाठी स्टेट बॅकसमोर नारळ विक्री करत असलेल्या श्रीमती पुनम विनोद दुसाणे या महिलेच्या लाॅरीजवळ गेलो... नारळाची किंमत विचारली..९०/- रुपयाला दोन नारळ त्या महिलेने दिले... नारळ- पाणी पिता-पिता आम्ही दोघेही जरा चौकस बुद्धीचे असल्याने त्या महिलेला काही प्रश्न विचारले.. चर्चा सुरू झाली.. चर्चेत आम्हाला त्या महिलेच्या चेहऱ्यावरील भाव.. डोळ्यातील अश्रू कमजोर करत होते... आमच्या काळजाचे ठोके कमजोर करत होते.. आम्ही स्तब्धपणे उभे राहुन त्या महिलेची दर्दभरी कहाणी ऐकत होतो.. नारळ-पाणी तर पीत होतो.. पण सोबतच त्या नारळ-पाणीसोबत अश्रुंचाही कंठातल्या कंठात मिलाप होत होता... आपण तर नुसते या महिलेचे दयनीय हाल ऐकत आहोत.. पण ही महिला.. हिचा परिवार तर ते सहतो आहे या भावनेने तन-मनातील नसा बधीर होत होत्या... ती महिला एसटी डेपोतील एका कर्मचाऱ्याची अर्धांगिनी आहे.. कोरोनामुळे लाॅकडाऊन लागल्यापासुन या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार नाही.. आता तर हे कर्मचारी आपल्या न्याय मागण्यांसाठी संपावर आहेत.. मायबाप सरकार यांच्या वेदना समजुन घ्यायला तयार नाही.. या कर्मचाऱ्याना रस्त्यावर पाहुनही.. या कर्मचाऱ्यांचा परिवार पगाराविणा उपाशी-तापाशी पाहुनही मायबाप सरकारमध्ये मानवतावादी भावना जागत नाही.. कदाचित! या कर्मचाऱ्यांमध्ये सरकारचे कोणी नातेवाईक नसतील... कदाचित ! या कर्मचाऱ्यांच्या घरातील बायका मायबाप सरकारच्या आया-बहिण्या नसतील... कदाचित ! मायबाप सरकार या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील दगड-गोटेच समजत असेल.... कित्येक महिन्यापासुन पगार नसल्याने या कर्मचाऱ्यांसमोर.. त्यांच्या परिवारासमोर दोन वेळच्या भाकरीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे... कित्येक महिन्यापासुन पगार नसल्याने किराणा दुकानदारही आता या कर्मचाऱ्यांना आपल्या दुकानासमोर उभे राहू देण्यासही तयार नाही.. मुळातच या कर्मचाऱ्यांना इतर बॅका कर्जही देत नसल्याने या कर्मचाऱ्याचे सर्वच आर्थिक स्त्रोत बंद झालेले आहे... पोटाची आग या परिवाराला.. या परिवारातील लेकरांना स्वस्थ बसू देत नाही.. झोपू देत नाही म्हणुन श्रीमती पुनम विनोद दुसाणेसारख्या अनेक महिला आपल्या परिवाराची पोटाची/ भुकेची आग शमविण्यासाठी काहीतरी काम-धंदा करावा म्हणुन रस्त्याच्या कडेला दिवसभर उभे राहत दोन-चार पैसा कमविण्याचा केविलवाणा प्रयत्न करता आहे... श्रीमती पुनम विनोद दुसाणे या महिलेला दोन मुली,एक मुलगा,पती,वृद्ध सासु-सासरे असा परिवार आहे... कमविणारी एक आणि तिच्यावरच पोट असणारे सात... विश्वास बसत नाही.. खरच तिच्या दिवसभराच्या कमाईवर तिच्या परिवाराची पोटाच्या भुकेची आग शमत असेल का ? कि भुकेल्या पोटाला शमविण्यासाठी पाण्याचाच आसरा घेतला जात असावा... कि अश्रुंचे घोट पीत-पीत हा परिवार दिवस व्यतीत करत असावा.... ही दर्दभरी कहाणी एकट्या श्रीमती पुनम विनोद दुसाणे यांचीच नसुन महाराष्ट्र राज्यातील लाखो एसटी डेपोतील कर्मचारीवर्गाची आहे.... सरकार या असहाय्य एसटी डेपोतील कर्मचारीवर्गाची वेदनादायी,नरकदायी कहाणी जाणो... या कर्मचारीवर्गाला न्याय देवो ... हीच एक माय-बाप सरकारपुढे हात जोडुन विनंती.
लेखक: श्री. करणसिंग शंकर तडवी
0 टिप्पणियाँ