आदिवासी ‘डोंगऱ्यादेव उत्सवा’तील निसर्गपूजकता आणि वैज्ञानिक सत्य…
संकलन:- तानाजी झनकर
डोंगऱ्यादेव हा नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात साजरा केला जाणारा आदिवासी बांधवांचा एक उत्सव आहे. या कार्यक्रमाची वार्ता, फोटो, व्हिडीओ आदी बिगर आदिवासी भाग -शहरी भाग यांत पसरले तेव्हा अनेक विज्ञानवादी, साहित्यिक, विचारवंत आणि सो कॉल्ड शिक्षित लोकांनी ही केवळ एक अंधश्रद्धा आहे म्हणून जाहीर करून टाकलेलं असल्याचे जाणवत असते. अनेक वेळा प्रसारमाध्यमांतुन ही आदिवासी भागात ‘अंधश्रद्धेचा बाजार’ या आशयाच्या बातम्या रासरोज दाखवल्या गेलेल्या आहेत. हे सर्व होत असतांना मी ज्या संस्कृतीत, समाजात जन्मलो -वाढलो, लहानपणापासून जो डोंगऱ्यादेव बघितला त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याची सकारात्मक बाजू मांडण्याचा ध्यास घेतला आहे.
जगातील, भारतातील मुळनिवासी/ आदिवासी लोक हे निसर्ग पुजक आहेत. निसर्ग तत्वज्ञान हे आदिवासी संस्कृतीचे अधिष्ठान आहे. निसर्गाच्या सानिध्याने, गण पद्धतीवर जगणाऱ्या आदिवासी गणाचे टोटेम हे त्यांच्या संस्कृतीचे मुल्ये आहे. आदिवासी गणांचे टोटेम प्राणी, वृक्षवेलीवर आधारीत असून, आदिवासी आपल्या टोटेमाची म्हणजे प्राणी व वृक्षाची पूजा करतात. आदिवास्यांचे देव नाहीत, देवाची मुर्ती नाही, देवाचे मंदिर नाही. ते फक्त निसर्गाची म्हणजे पृथ्वीवरील वृक्ष -प्राण्यांची पूजा करतात. निसर्गाची पूजा करतात, त्याच निसर्ग पूजेचा एक भाग म्हणजे डोंगऱ्यादेव होय!
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, धुळे जिल्ह्यातील साक्री ह्या तालुक्यात प्रामुख्याने डोंगऱ्यादेवाचे कार्यक्रम प्रत्येक आदिवासी पाड्यात होत असतात. आदिवासी भागात साधारणपणे पावसावर अवलंबून शेती केली जाते. या पिकांत कणसरी, (नाचणी) भात, वरइ ही मुख्य पिके आहेत. या सर्व पिकांची कापणी आणि मळणी झाल्यानंतर निसर्गाचे आभार मानण्यासाठी खऱ्या अर्थाने डोंगऱ्यादेव उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला जातो. डोंगऱ्या देव, किंवा भाया हा कार्यक्रम साधारणतः ५ किंवा ७ दिवस चालतो. प्रत्येक भागानुसार पूजा पद्धती रूढी, परंपरा,कार्यक्रमाची रूपरेषा ही वेगवेगळी असते. आणि कार्यक्रमाचा मुख्य भगत सांगेल त्या पद्धतीने होते. यात भगत, कथाकरी, थाळकरी, पावऱ्या हे महत्वाचे मानले जातात…
मोकळ्या जागेत (खळी) कणसरा देवडोंगऱ्या पूजेसाठी निसर्गाने दिलेल्या देणगीचे अर्थात कणसरी(नाचणी), भात यांची पुंज/धान मांडली जाते. त्याच्या भोवतो तांदळाच्या धान्याची गोलाकार ठिपक्यांच्या वर्तुळ तयार केला जातो. त्यात वेळूची काठी रोवून जी फुलझाडे निसर्गतः तयार झालेली अशी असंकरित झेंडू देवकुरडू, अंबाडी ह्या फुलांची झाडे मुळासकट उलटून वेळूच्या काठीला नाचणीच्या पुंज धाना वर आंबडीच्या सालीपासून तयार केलेल्या दोरीच्या सहाय्याने बांधली जातात. दगडी दिवा पेटवला जातो, तसेच काकडी, डांगर, भोपळा ह्या सर्वांची म्हणजेच निसर्गाने जगण्यासाठी ज्या वस्तू बहाल केल्यात त्या सर्व वस्तू मांडून ह्या सर्व बाबींद्वारे निसर्गच संपूर्ण स्वरूप मांडून निसर्गाची पूजा केली जाते…
“फुला फुला चे साग र.. कनसरा…”
असा जयघोष केला जातो
कार्यक्रमाच्या ठरवलेल्या मुदती प्रमाणे थोंबाजवळ मावल्या फेर धरून हातात घुंगराची काठी घेऊन नाचतात. या कार्यक्रमा दरम्यान कडक पथ्याचे उपवास पाळावे लागतात, मावल्यांना खायला फक्त कोंडी दिली जाते, सकाळी मावल्या अनवाणी पायानेघरोघरी फिरून धान्य जमा करतात. उत्सवाच्या समाप्तीला मावल्या गड जिंकायला जातात त्या ठिकाणी निसर्गच प्रतीक असलेल्या डोंगराची पूजा केली जाते व शेवटी बोकडबळी देऊन गावभंडाऱ्याने कार्यक्रमाची समाप्ती होते. हा संपूर्ण कार्यक्रम होत असताना कुठल्याही धर्माच्या कुठल्याही देवाचा लवलेश नसतो पूर्णतः निसर्ग पुजाचं चालत असते.
हे सर्व निसर्गाचे उपकार मानायला केला जाणारा कार्यक्रम असला तरी याबाबत अंधश्रद्धेचा बिरुदावल्या का लावल्या जातात? तर अंगात येणे म्हणजे वारा येणे हा विषय टीकाकार केंद्रस्थानी ठेवून युक्तिवाद करत असतात. मग खरोखर ही अंधश्रद्धा की आणखी काही? तर त्याचा उलगडा पुढील प्रमाणे:
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ५ मावल्या निवडल्या जातात त्या शेंदरा सवर, फुला सवर, जेला सवर, गुंजा सवर आणि कणसरी आहेत. या मावल्यांपैकी ज्याला सर्वात पहिले वारा (अंगात) येईल ती मावली शीरभाया आहे. मग वारा येणे अंगात येणे ही खरोखर अंधश्रद्धा असेल का? की त्यामागे आणखी काही कारण! तर त्याच्या मुळाशी गेल्यानंतर स्पष्ट झाले की, ह्या पाच मावल्यांना एकटक दगडीदिव्याच्या ज्योतीकडे बघायला सांगितलं जातं असून मन एकाग्र केलं जातं. पुढे थाळकरी आणि कथकरी कथा लावतो व पावऱ्या पावरीद्वारे संगीत रूपाने संमोहित करण्याचं काम करत असतो. तात्पर्य, एकंदरीत हा सर्व भाग हा अंधश्रद्धेचा नसून हा ‘संमोहनाचा’ भाग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
हजारो वर्षांपासून आदिवासींनी संगीतातून संमोहनाचा शोध लावलेला आहे ही खर तर अभिमानाची बाब आहे.
हा सर्व प्रकार संमोहनाद्वारे dual personality disorder करण्याचा आहे. म्हणजे एकदाच आपल्या शरीरात आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तिमत्वाचा झालेला संचार होय. आणि नेमकं ह्या विज्ञानवादी बाबीला सुशिक्षित लोकांकडून अंधश्रद्धेवर लोटलं जात खर तर ही खेदाची बाब आहे, आणि हा संशोधनाचाही विषय आहे.
बगळा भूत वाघाम्बरा मावली म्हाशा येतळ मोहळ, चोरटी, खानोळी खाटी आणि साठी वीर अग्नी येताळ मावली, गुंजा सवर, शेंदरा सवर पारा सवर, काजळा सवर, मारुती, कुलदेव, वाघदेव पंगार भूत, बगळा भूत, रान भूत, माकाड देव, पाळांगण, मोठादेव, जोगमा, आळवटी मावली, गद्या गाढव, राजमाता, वरूनदेव, रानवा फिरस्ता राणवा, गोदव्या राणवा, म्हशा, गाव देवी, खानोली देवी, ही सर्व संमोहनाद्वारे तात्पुरत्या स्वरूपाची (जो पर्यंत पावरीचे संगीत चालू आहे तो पर्यंत) dual personality disorder ची रूपके आहेत. आणि केवळ संमोहनाच्या प्रभावातच वारे खेळली जातात व ह्या रुपकांच्या माध्यमातून काट्यांवर लोळणे, आगीवर लोळणे, विस्तव खाणे, कडक जागा हाताने उकरून खड्डा बनवणे असे प्रकार घडत असतात. हा आजार नसून डोंगऱ्यादेव कार्यक्रम कार्यकाळात पावरीचे संगीत सुरू आहे तोपर्यंतच विशिष्ट ठिकाणी म्हणजे जिथं डोंगऱ्या देवाची खळी आहे तिथंच संमोहनाद्वारे हा प्रकार Dual Personality Disorder क्रिएट केला जातो. म्हणजे वातावरण निर्मिती करून हे संमोहन टिकवता येत असत. अन्य वेळी वारा घेणाऱ्यांवर याचा काहीच प्रभाव वा फरक जाणवत नाही. केवळ वर्षातून एकदाच ह्या कार्यक्रमाच्या वेळी हे घडत.
ज्याला वारा घ्यायचा असेल म्हणजेच संमोहित व्हायचं असेल त्याला भगत वारा थापून म्हणजेच संमोहित करून देत असतो. मावल्यांनी वारे खेळणे हा फक्त आणि फक्त संमोहणाचाच भाग असून यात अंधश्रद्धेला कुठं ही थारा नाही, हे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बाजूला ठेवून चिंतन करायला हवं.
जगातील, भारतातील मुळनिवासी /आदिवासी लोक धर्माऐवजी आपले पवित्र स्थळ माता पृथ्वीची तसेच निसर्गाची पूजा करतात. ह्या कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीद्वारे जगासमोर मांडलं जात की
निसर्गा तूझ्या कृपेने ह्या वर्षी भात वरइ आणि कनसरा (नाचणी) ह्या प्रमाणे इतर पिके ही चांगली आली. आमची भरभराट झाली. आम्हाला बरकत मिळाली. पुढेही सर्वांना अशीच बरकत मिळु दे…
अंततः डोंगऱ्यादेवातील वारा हे केवळ संगीताद्वारे केलेलं संमोहनचं!
(लेखक आदिवासी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता असून हे त्यांचे वैयक्तिक मत आहे.)
0 टिप्पणियाँ